पुस्तकाचे नाव : प्रभाते मनी
लेखिका : आसावरी काकडे
मुद्रक व प्रकाशक : बिझनेस आयकॉन
मुखपृष्ठ : पराग गोरे
मांडणी : होरायझन स्प्रेड मीडिया सर्व्हिसेस
प्रथम आवृत्ती : ३ में २०२२
पुस्तक किंमत : रु. १७५/- (फिजिकल कॉपी)
भाषा : मराठी
पृष्ठे : ९६
मनोगत
‘तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं..’ हे स्मार्ट फोनच्या बाबतीतही म्हणता येईल इतका त्यानं आपल्या जगण्याचा ताबा घेतला आहे. कारण आपल्या सध्याच्या जीवनशैलीत आवश्यक होऊन बसलेला फोन, कॅमेरा, घड्याळ, कॅल्क्युलेटर, रेडिओ, टीव्ही, बँकिंग, शब्दकोष, ग्रंथभांडार, मार्गदर्शक… सगळं ‘अंडर वन रूफ’ तेही अगदी आपल्या हातात अणून ठेवलंय त्यानं..! त्याच्याशिवाय आता आपलं पानही हलेनासं झालं आहे..!
या अनेक सुविधांपैकी व्हॉट्सॅप या माध्यमाचा वापर बघता बघता सर्वांच्या खूपच अंगवळणी पडला आहे. सुरुवातीला याचा अगदी किरकोळ, काहीसा उथळ वापर होत होता. पण आता त्याच्या जोडीनं याचा विधायक आणि सर्जनशील वापरही होऊ लागला आहे. बर्याच व्हॉट्सप ग्रुपवर अर्थपूर्ण उपक्रम चालतात. माझा एक ग्रुप बनवून मीही सुप्रभातच्या निमित्तानं जवळच्या सगळ्यांशी संपर्कात राहण्याची सोय केलीय. त्यावर सुप्रभात म्हणून पाठवण्यासाठी फोटो काढणे आणि त्या फोटोवर कवितेच्या चार-दोन ओळी लिहिणे हा छंद बरेच दिवस चालला. त्याला खूपच छान प्रतिसाद मिळाला. कधी कवितारूपात तर कधी खूप आवडल्याचं कळवून. सृजनाला साद घालत दिवसाची सुरुवात करून देण्यातला आनंद सुखावणारा होता. नंतर मी जरा वेगळे उपक्रम घेऊ लागले. फोटो-काव्य हेच सूत्र असलेले ‘ज्ञानेश्वरीतील उपमा’, ‘Thoughts in Nutshell’ असे दोन ब्लॉग मी बनवले आहेत. काही दिवस त्यातले फोटो-काव्य शेअर केले. अलिकडे पूर्ण वेगळे, विचारांना चालना देऊन अंतर्मुख करणारे तीन उपक्रम घेतले. आठवड्यातून एक-दोनदा घेतलेल्या या उपक्रमांनाही छान प्रतिसाद मिळाला. अर्थपूर्ण चर्चा झाल्या. ते उपक्रम असे-
१- ‘तुकोबांचा आकांत-प्रवास..’ या उपक्रमांतर्गत संत तुकारामांचे निवडक अभंग घेऊन त्यातून त्यांच्या आंतरिक परिवर्तनाचा प्रवास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला.
२- ‘चांगदेवपासष्टी : एक आकलन’- चांगदेवपासष्टीतल्या ओव्यांचे आजच्या मराठीत मी केलेले पद्य-रूपांतर आणि त्यावरचे छोटेसे भाष्य शेअर करणे असं या उपक्रमाचं स्वरूप होतं.
३- ‘गीता आणि आपण..’ या उपक्रमात गीतेतले महत्त्वाचे श्लोक, त्यांचे गीताईतील मराठी रूपांतर, ज्ञानेश्वरीतल्या त्यावर भाष्य असलेल्या एक-दोन समर्पक ओव्या, सरळ अर्थ आणि अर्थविस्तार अशी मांडणी केली होती.
या निमित्तानं या विषयांचा अभ्यास झाला. त्यावर विचार झाला. छान चर्चा झाल्या. अर्थात याला व्हॉट्सॅप या माध्यमाच्या मर्यादा होत्या. त्यामुळे उपक्रमासाठी निवडलेले विषय व्यापक असूनही मी अगदी थोडक्यात आणि सहज समजेल अशा रीतीनं लिहिलेलं आहे. मोबाईल स्क्रीनमागे हे लुप्त होऊन जाऊ नये, सलगपणे परत वाचता यावं म्हणून या तीन महत्त्वाच्या उपक्रमांचं ‘प्रभाते मनी’ या नावानं संकलन केलं आहे. यामधे ग्रुपवर झालेल्या चर्चांचा समावेश करता आला नाही. पण आता ते ईपुस्तकरूपात अनेकांना वाचता येईल आणि त्यावर खुलेपणानं चर्चा होऊ शकेल…
– आसावरी काकडे
Add comment