पारंपरिक खाद्यपदार्थाची गोडी आणि नवकल्पनांचा संगम म्हणजे मानसी मिलिंद मिरजकर यांच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य. ‘श्री योग’ या नावाखाली त्यांनी साधेपणातून सुरू केलेला व्यवसाय आज अनेकांच्या घरोघरी पोहोचला आहे.
मानसींनी त्यांच्या सासूबाईंकडून पारंपरिक पदार्थ कसे करायचे हे शिकत घरगुती पाककला हाताळली. सुरुवातीला त्यांनी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी घरच्या घरी गोडा मसाला आणि थालिपीठ भाजणी करायला सुरुवात केली, जी लगेचच लोकप्रिय ठरली. लोकांच्या प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे त्यांनी व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी उपवास भाजणी, मेतकूट, अंबोळी पीठ,मुखवास, बेसन लाडू, रवा लाडू, चिवडा इत्यादी पदार्थांची निर्मिती सुरू केली, त्याचबरोबर जवस लाडू, नाचणी गूळ लाडू यासारखे प्रयोग करत पारंपरिकतेत नवा रंग भरण्याचा प्रयत्न केला. ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांनी गहू, ज्वारी, डाळीचे पीठ, आणि आता मल्टिग्रेन आटा यासारखे उत्पादन विकसित केले. प्रत्येक पदार्थात गुणवत्ता आणि स्वच्छतेची हमी हे मानसींच्या प्रयत्नाचे मुख्य उद्दीष्ट आहे.

व्यवसायाच्या या प्रवासात मानसींच्या समोर अनेक आव्हाने आली. नोकरी सांभाळताना घराच्या जबाबदाऱ्या, सासूबाईंचे वाढते वय, आणि अचानक त्यांच्या पतींचे झालेले निधन यांसारख्या परिस्थितींचा सामना करत त्यांनी व्यवसाय टिकवला. त्यांच्या आजूबाजूच्यांच्या सहकार्यामुळे त्यांचा या व्यवसायवृद्धिबाबतच्या इतरांचा त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे या आव्हानांवर मात केली.
या व्यवसायातली खरी आनंदाची भावना त्यांनी त्यांच्या पदार्थांना ‘फूड लायसन्स’ मिळाल्यानंतर अनुभवली. त्यांच्या सर्व पदार्थांचे वैशिष्ट्य असे की, परदेशात राहणाऱ्या मुलांसाठी पालक विशेष मागणी करून घेऊन जातात, कारण त्यांना चव आणि स्वच्छतेची खात्री मिळते.
मानसींचा दृष्टिकोन स्पष्ट आहे – स्पर्धेत सामील होणे हा उद्देश नसून आपले काम उत्कृष्ट करून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणे महत्त्वाचे आहे. छोट्या गोष्टीतून आनंद घेणे, सतत प्रयोग करणे आणि गुणवत्तेवर भर देणे हे त्यांच्या व्यवसायाचे मुख्य तत्व आहे.

‘श्री योग’ ही फक्त एक ब्रॅंड नाही; ही पारंपरिकतेला नवे आयाम देणारी, ग्राहकांच्या विश्वासावर आधारित आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी ओळख आहे. मानसी मिलिंद मिरजकर यांचा प्रवास साधेपणापासून उद्यमशीलतेपर्यंत प्रेरणादायी ठरतो, ज्यातून प्रत्येक महिला उद्योजकाला शिकण्यासारखे बरेच काही आहे.
Email : manasimirajkar2@gmail.com
Contact : 9420730265