पुस्तकाचे नाव : Thoughts in a Nutshell
लेखक : लक्ष्मण केशव आपटे
भावानुवाद, छायाचित्रे, मुखपृष्ठ : आसावरी काकडे
‘सेतू’ डी१/३ स्टेट बँक नगर कर्वेनगर, पुणे ४११०५२
फोन नं. ९४२१६७८४८० / ९७६२२०९०२८
ईमेल- asavarikakade@gmail.com
आतील मांडणी : केशव लक्ष्मण आपटे
प्रकाशक : पराग गोरे / बिझिनेस आयकॉन
प्रकाशन तिथी : २८ आक्टोबर २०२१
भाषा : मराठी / इंग्रजी
पृष्ठे : ८४
किंमत : विनामूल्य
मनोगत :
लक्ष्मण केशव आपटे- माझे वडील. ते सतत काहीतरी लिहीत, वाचत असायचे. लेखन स्फुट स्वरूपाचं असायचं आणि वाचन अध्यात्मिक ग्रंथांचं. स्वगत चिंतन केल्यासारखं लेखन. अध्यात्म हाच विषय. बहुतेक लेखन इंग्रजीत होतं. तेव्हा आम्ही भावंडं लहान होतो. त्यांनी लिहिलेलं फारसं कधी वाचायला मिळालं नाही. काही वर्षांपूर्वी अचानक, त्यांनी १९७२ च्या सुमारास कागदाच्या २० फुटी पट्टीवर लिहिलेल्या १६० विचारांची एक गुंडाळी (त्यांनी याला nutshell म्हटलंय) मला मिळाली. माझी बहीण प्रतिभा गोरे हिनं ती जपून ठेवली होती. मला खजिना सापडल्याचा आनंद झाला. पण जीर्ण व्हायला लागलेल्या त्या गुंडाळीतले ३६ विचार गहाळ झालेले. हाती लागले ते १२४ विचार मी सलग लिहून काढले. समजून घेण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून मूळ इंग्रजीत लिहिलेल्या विचारांचा अभंग छंदात अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. नीट समजलेत असं वाटलं त्यातला एकेक विचार आशयाला साजेशा फोटोवर लिहून अभंग छंदातील दोन ओळीत केलेला त्याचा स्वैर भावानुवाद त्याखाली लिहीत गेले. २०१५ साली ‘Thoughts in a Nutshell’ या ब्लॉगच्या माध्यमातून वडिलांचे हे विचारधन सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला होता. हाती लागलेल्या विचारधनातून फक्त ७० विचारच मला त्यात घेता आले होते.
त्याचंच ई पुस्तक करावं असं मनात आलं. त्या निमित्तानं सर्व परत वाचलं तेव्हा जाणवलं की मी केलेला अनुवाद खरंतर त्या कागदी पट्टीवर लिहिलेल्या शब्दांचा आहे. विचारांचा नाही. वडलांचे लिखित विचार समजून घ्यायला याचा उपयोग होऊ शकेल. पण त्यांना काय म्हणायचं आहे ते वाचणार्या प्रत्येकाला वेगवेगळं समजेल. लेखकापासून सुटून होणारं असं विचारमंथन हे त्या लेखनाचं सार्थक असतं. ई-पुस्तकाच्या माध्यमातून ‘नटशेल’ मधले विचार मुक्त होऊन वाचकांपर्यंत पोचतील आणि या प्रक्रियेला सुरुवात होईल अशी आशा आहे.
‘Thoughts in a Nutshell’ या ब्लॉगचं ई-पुस्तक करण्याच्या दृष्टीनं विचार करताना लक्षात आलं की फोटोंवर लिहिलेली वाक्यं नीट वाचता येत नाहीएत. म्हणून ती आता फोटोंखालीही घेतली आहेत. पाच सहा वर्षांपूर्वी केलेला भावानुवाद आता परत वाचताना त्यातही काही बदल सुचले ते केलेत. वडलांचा स्वतंत्र परिचय दिला. मिळाले ते फोटोही घातले. या सगळ्यामुळे हे पुस्तक म्हणजे केवळ ब्लॉगचं रूपांतर असं न होता ही एक नवनिर्मिती झाली असं वाटतं आहे.
ईपुस्तक करायचं तर ठरलं. पण त्यासाठी ब्लॉगची वर्ड फाईल बनवणं मला जमण्यासारखं नव्हतं. ते कौशल्याचं काम माझा भाऊ दिलीप आपटे यानं करून दिलं. पुस्तकाच्या दृष्टीनं, आतील आशयाला साजेशी स्क्रिप्टची नेटकी मांडणी करतानाही त्यानं सर्व सहकार्य केलं. विशेषतः फोटोंवर लिहिलेली वाक्यं नीट कळावीत म्हणून फोटोंखालीही घ्यायचं ठरल्यावर ते लिहिण्याचं मोठं कामही त्यानं केलं. या निर्मिती-प्रक्रियेत माझ्या इतर भावंडांचाही सक्रीय पाठींबा मला मिळत राहिला. आमचा भाचा पराग गोरे यानं प्रकाशकीय नजरेतून काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यामुळे पुस्तकाची निर्मिती उत्तम होऊ शकली. परागच्या बिझिनेस आयकॉन प्रकाशनातर्फे हे ईपुस्तक प्रकाशित होत आहे याचा विशेष आनंद वाटतो.
हार्दिक सहकार्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे.
आसावरी काकडे