या माणसाचं वर्णन कसं करायचं मला प्रश्नच पडला. कधी हा माणूस अतिआत्मविश्वासू वाटतो तर कधी एकदम फिलॉसॉफर वगैरे… कधी एकदम तुमच्यामाझ्यासारखा कुटुंबवत्सल दिसतो तर कधी ध्येयाने पेटून उठलेला उद्योजक. उमेश शिंदे नावाच्या याच अजब रसायनाची ओळख…
उमेश यांच्यासोबत बोलत असताना एक माणूस त्यांच्या कार्यालयात आला. थेट त्यांच्या टेबलपाशी गेला. उमेश यांनी एक पाकीट त्याच्या हातात दिलं. त्या माणसाने पाकिटातून काही पैसे घेतले, त्या पाकीटावर काही लिहिलं आणि परत पाकीट जिथल्या तिथे ठेवून उमेश यांच्या शेजारी बसला. पैशाचा विषय आला की उद्योजक इतका गाफील राहू शकतो… असं वाटलं. नंतर उमेश शिंदेंचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं तसा याचा खुलासा झाला. या माणसाने आपल्या सभोवती विश्वासाची माणसं पेरली आहेत नव्हे आपल्या भोवतालच्या माणसांमध्ये विश्वासाची पेरणी केलीय.
माणसं बदलणारा माणूस
वरच्या परिच्छेदात ज्यांचा उल्लेख केला आहे ते पिग्मी एजंट. ते यापूर्वी तासनतास धावपळ करून दिवसाला दहा हजारांची रक्कम जमा करायचे. उमेश यांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांनी छोटी खाती नाकारून एक हजार आणि त्यापुढची खाती स्वीकारायची कल्पना सांगितली. वेळेचं नियोजन शिकवलं. आता ते पाच ते सात या वेळेत काम करून अठरा ते वीस हजारांची रक्कम गोळा करतात. याशिवाय याआधी पूर्ण दुर्लक्ष झालेल्या आरोग्य, फॅमिली, एऩ्जॉयमेंट या गोष्टींसाठीही वेळ देतात.
भोर ते पुण्याचा प्रवास
उमेश हे मूळ भोरचे. कुटुंबासोबत ते पुण्यात आले. अरण्येश्वर विद्यालय, सरस्वती विद्यामंदीर आणि नंतर फर्ग्युसन महाविद्यालय असा त्यांचा शैक्षणिक प्रवास झाला. फर्ग्युसनमध्ये त्यांनी सरफेस कोटींग टेक्नॉलॉजीचा कोर्स केला. कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्याला काही नोकरी जमणार नाही, असं त्यांनी वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितलं आणि तोवर सूर सापडलेल्या आरटीओच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं.
उद्योजकतेचा वसा
शाळा-कॉलेजात असतानाच दिवाळीच्या सुटीत कॅलेंडर विकणे, अन्य छोट्या-मोठ्या वस्तू विकणे आणि त्यातून पैसे कमावणे हा उमेश यांचा छंद. त्यातूनच उद्योजकतेचा वसा त्यांना मिळाला. या सगळ्यातून त्यांना चांगले पैसे मिळत. त्यामुळे स्वतः होस्टेलवर राहात नसले तरी तिथे राहात असलेल्या काही गरीब मित्रांची फी ते भरायचे. त्या काळापासून जनसंपर्काची ही कला त्यांनी जोपासली आणि त्याच्या जोरावरच एक यशस्वी उद्योजक म्हणून कारकीर्द उभी केली.
व्यवसायातही स्वतंत्र अस्तित्व
पुणे शहरात आजघडीला अक्षरशः शेकडो आरटीओ एजंट आहेत. त्यात तुमचं वेगळेपण काय… असं विचारल्यावर उमेश यांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितलं की, जनसंपर्क आणि प्रत्येक ग्राहकासोबत कौटुंबिक नातं हे त्यांचं वेगळेपण आहे. प्रत्येक ग्राहकाला विनाकटकट सेवा पुरवणे, सेवा घेतल्यानंतर त्यांचा ट्रॅक ठेवणे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे यातून हे नातं ते कायम ठेवतात.
शंभर लोकांना करोडपती बनवण्याचा संकल्प
आजघडीला वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये यशस्वी असलेल्या उमेश यांची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. पण ते ज्या मार्गाने यशस्वी झाले तो यशाचा राजमार्ग इतर लोकांनाही दाखवावा, त्या मार्गावर चालून त्यांनीही करोडपती बनावं, असं त्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी येत्या वर्षभरात किमान शंभर लोकांना करोडपती बनण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करण्याचा संकल्प सोडला आहे.
छत्रपती शिवरायांचा वसा
छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व आणि विचार याविषयी उमेश यांना प्रचंड आदर आहे. आजवर त्यांनी दीडशेहून अधिक गड-किल्ले चढले आहेत. त्यांचा शिवविचारांचा अभ्यास सातत्याने सुरू असतो.
निराश झालेल्यांना बळ
संमोहनशास्त्राचा उमेश यांचा दांडगा अभ्यास आहे. त्याचा प्रॅक्टिकल अनुभवही आहे. त्यातूनच विविध कारणांनी निराश झालेले विद्यार्थी, नागरीक अशा 180 लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात त्यांना यश मिळाले आहे. या लोकांना जगण्यासाठी नवे आत्मबल देण्याचे महत्त्वाचे कामही उमेश यांनी केले आहे.
कुटुंब आणि समाजासाठी वेळ
उत्तम वक्ता, कुशल संघटक असल्यामुळे विविध संस्था-संघटना व्याख्यानं देण्यासाठी त्यांना आमंत्रित करतात. स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास अशा विषयांवर ते व्याख्यानं देतात. दिवसभराच्या वेळेचं त्यांनी उत्तम नियोजन केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ते त्या नियोजनाबरहुकूम काटेकोरपणे काम करत असतात. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही ते कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक देतात.
लाखोंशी दांडगा जनसंपर्क
आतापर्यंत त्यांनी सुमारे दोन लाख लोकांची आरटीओशी संबंधित कामे करून दिली आहेत. याशिवाय विविध माध्यमातून संपर्कात आलेल्या लोकांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. या सगळ्यांशी ते आवर्जून नाती जोपासतात. हे लाखो लोक हीच आपली संपत्ती आहे, असं ते मानतात. लोकांना स्वतःची कुवत आणि ताकद माहित नसते. त्याची ओळख त्यांना करून देण्याचं काम ते अविरत करत असतात.
चौकट – पहाटे पावणेतीन ते रात्री नऊ
उमेश यांचा दिवस पहाटे पावणेतीन वाजता सुरू होतो. मॉर्निंग वॉक, व्यायाम उरकल्यावर बिझनेस नेटवर्किंगसाठी ते पहाटे पाच ते आठ हा वेळ देतात. तसाच संध्याकाळी पाच ते आठ हे तीन तासही बिझनेस नेटवर्कींगसाठी राखीव असतात. नऊ ते पाच हा वेळ फक्त आणि फक्त आरटीओच्या कामासाठी असतो. दिवसभरात सोळा-सतरा तास काम करूनही त्यांच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर थकव्याचा लवलेशही जाणवत नाही.
HREF फिलॉसॉफी
नोकरी-उद्योग किंवा काहीही करण्याआधी आपल्या जीवनाच्या चार चाकांचं अलाईनमेंट केलं पाहिजे, असं उमेश सांगतात. हेल्थ, रिलेशन्स, एन्जॉयमेंट, फायनान्स (HREF) ही ती चार चाकं आहेत. आरोग्य उत्तम राखायलाच पाहिजे. तुमच्या कुटुंबीयांशी, मित्र-नातेवाईकांशी उत्तम नातीही जपली पाहिजेत. गाणी म्हणत-ऐकत आंघोळ करणं हेदेखील एन्जॉयमेंट आहे, असं ते सांगतात. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पैशाचं योग्य नियोजन करता येणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ही चार चाकं सुरळीत असली की मग तुम्हाला कसलीच अडचण येत नाही.
बेस्ट चिल्ड्रन, बेस्ट फॅमिली, बेस्ट पीपल
रोज सकाळी तुमच्या पत्नीला, मुलांना मिठीत घ्या आणि त्यांना सांगा की तुम्ही जगातली सर्वोत्तम पत्नी-मुले आहात. स्वतःला सांगा की आपलं कुटुंब सर्वोत्तम आहे. आपल्याला मिळालेला जोडीदार, मुलं ही उत्तम आहेत. हे रोज केलं तर तीन महिन्यांत तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल. तसंच तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीतून सर्वोत्तम अशी एकतरी गोष्ट शिका, आत्मसात करा. शेवटी जीवनाचं उद्दिष्ट काय तर उत्तम माणूस बनण्यासाठी सतत स्वतःला अपग्रेड करत राहणं हेच ना…
उदात्त, मेहनती आणि शक्तीशाली असा आपल्या नावातील अक्षरांचा अर्थ सांगणारे, विचारांची व्यापक बैठक असलेले उमेश देण्यासाठी सदैव तत्पर असतात. या माणसाने लाखो लोकांची आरटीओची कामे केली आहेत. त्याबरोबरच हजारो लोकांना स्वतःचं जीवन बदलण्याची प्रेरणाही दिली आहे. त्यांच्या संपर्कात येणारा कोणीही नव्या विचारांनी भारून गेल्याशिवाय राहात नाही. बदल हा काळाचा नियम आहे. अनेकांच्या जीवनात अशा बदलासाठी उमेश निमित्त ठरले आहेत. हजारो लोकांच्या जीवनरथाचा सारथी असं उमेश यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन केल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
Contact : 9922412349
Email : shindeasso@gmail.com
Add comment