Business Icon

समाजविकासाचा वसा बाळगणारी उद्योगिनी

चंद्रलेखा बेलसरे
उद्योजिका

मी पूर्वाश्रमीची चंद्रलेखा माधवराव जगताप. आम्ही जगताप मुळचे सासवडचे पण आमची वडिलोपार्जित इस्टेट पारनेर तालुक्यातील वडणेर येथे होती. पुढे आजोबांनी स्वकर्तृत्वावर शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला आणि जातेगाव खुर्द येथे जमिनी घेतल्या. शिरूर तालुक्यातील संत्रा-मोसंबीचे बागायीतदार म्हणून ते प्रसिद्ध होते.
माझ्या आई बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड या राज घराण्यातील! तर माझ्या आत्या देवासच्या पवार राजघराण्यात दिलेल्या! माझे वडील आणि आम्ही देवासला वास्तव्यास होतो. माझ्या आठवणीप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्यानंतर राज्यविलीनीकरानंतर देखील तोच थाट-बाट कायम होता.दसऱ्याला चांदीच्या अंबारीतून माझे मामा(आत्यांचे यजमान) हत्तीवरून सीमोल्लंघणासाठी निघायचे, त्यावेळी अभिमानाने उर भरून यायचा.रम्य त्या आठवणी!

त्यानंतर काही काळाने आम्ही वतनावर म्हणजे शेतीवर परतलो. येथेही संपन्नता होतीच. शिवाय आमच्या काकी देखील उच्च घराण्यातीलच होत्या म्हणून घरात उच्च संस्कार, उच्च मूल्य आमच्यावर रुजवण्यात आली.
आमच्या घराण्यात नोकरी पेशात कोणीच नव्हते म्हणून पुढील आयुष्यात शिक्षण घेवून सुद्धा नोकरी करण्याची मानसिकता कधीच रुजली नाही. विचार होता उद्योजिका बनण्याचा!

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे “G. S. Parakhe Industrial Excellence Award” स्वीकारताना श्री व सौ बेलसरे

त्याच विचारातून उद्योग उभारण्याचा ठाम निर्णय घेतला आणि पेंट्स, वार्णीशचा कारखाना उभारण्याचे ठरविले. त्यासाठी बीज भांडवल, बँकेकडून कर्ज घेवून जातेगावला उद्योग उभारणी करायचे ठरवले. त्यावेळी आलेल्या चांगल्या अनुभवातून जिद्द कायम राहिली. त्याच दरम्यान आमच्याकडे शरद जोशी यांचे शेतकरी आंदोलन सुरू होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला सरकारकडून हमी भाव मिळावा आणि त्यांच्यावरील अन्याय दूर व्हावा यासाठी शरद जोशींच्या चाललेल्या प्रयनांना पाहून स्फुर्ती मिळाली.

एके वर्षी शरद जोशी निपाणीला तंबाखू आंदोलनात व्यस्त असताना आमच्या शिरूर तालुक्यात कांदा खरेदीमध्ये अन्यायाने कांदा नाकारणाऱ्या नाफेडच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे आणि शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कांदा आंदोलनात उडी घेतली, तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आणि नाफेडला सर्व शेतकऱ्यांचा कांदा घेण्यास भाग पाडले. “तरुण भारत” या वृत्तपत्रात अर्धे पान विस्तृत लेख लिहून व्यवस्थेवर घणाघाती हल्ला केला. तेंव्हा पासून “शरद जोशींची बहीण” म्हणून सर्वजनांनी माझे उस्फुर्त स्वागत केले. मी लहानपणापासूनच थोडीशी विद्रोही मनोवृत्तीची होते. अन्याय मग तो कोणावरही झालेला असो, सहन होत नव्हता आणि त्याला वाचा फोडण्यासाठी “सत्यस्थिती विशद करणारे लिखाण” हे प्रभावी माध्यम आहे, हे मला समजले होते. तेथूनच माझा पत्रकारितेचा प्रवास सुरु झाला.

त्यानंतर माझा विवाह मध्यप्रदेशवासीय प्रमोदकुमार बेलसरे यांच्याशी झाला. त्यांनी आशिया खंडातील एकमेव अश्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपुर येथून ‘साखर तंत्रज्ञ’ म्हणून पदवी घेतली होती. ते एका साखर कारखान्याच्या मशिनरी बनविण्याच्या कंपनीत कार्यरत होते पण त्यांचा पिंड देखील नोकरीचा नव्हताच. घेतलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष काम करून अनुभव घेवून आम्ही 1990 मध्ये आमचा व्यवसाय सुरू केला.
तत्पूर्वी मी पुणे जिल्हा भाजपाची महिला आधाडी प्रमुख म्हणून काम करीत होते. पण मन राजकारणापेक्षा समाजकारणात रमत होते. उद्योगक्षेत्रात भरीव कामगिरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून 1990 साली “इंडियाना सुक्रोटेक पुणे प्रा.ली. “या कंपनीची स्थापना केली.कंपनीचा तांत्रिक विभाग माझे पती सांभाळत होते तर कंपनीचे सर्व व्यवस्थापन मी पाहत होते.

महाराष्ट्र राज्याचे माजी वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्योग श्री अवॉर्ड स्वीकारताना श्री व सौ बेलसरे

हळूहळू कंपनीचा विकास होत होता. माझ्या पतीचा या क्षेत्रात अद्याप प्रदीर्घ म्हणजे 9 वर्षांचा अनुभव झाला होता पण तरीही अधिक काहीतरी योगदान या शुगर इंडस्ट्रीला द्यायचा त्यांचा मानस होता. त्याच विचारांनी त्यांनी एक अभिनव यंत्राची निर्मिती करण्याचे ठरवले ज्यायोगे कमी खर्चात आधुनिकीकरण करून साखर कारखान्याचे उत्पादन बऱ्याच पटीने वाढू शकत होते. म्हणतात ना,”जहाँ चाह होती हैं, वहा राह निकल आती हैं।” तसेच झाले.जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी कारखान्यात आम्हांला तो नवीन प्रयोग करण्याची परवानगी मिळाली आणि “कॅन्टीनुअस व्हॅक्युम पॅन” हे नवीन धर्तीवर आधारलेले यंत्र तेथे बसले आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याला अभूतपूर्व यश मिळाले.आज भारतातील जवळजवळ बहुतांश कारखान्यात आणि परदेशातही आमचे पेटंटेड यंत्र ख्याती मिळवून आहे.

त्यानंतर बरेच संशोधन करून आणखी काही यंत्रासमग्रीची आम्ही निर्मिती केली, त्यालाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आणि आमचे हे यंत्र कुठेच कुचकामी ठरले नाही तर तो साखर उद्योगातील मैलाचा दगड ठरला आहे.आज कॅन्टीनुअस व्हॅक्युम पॅन म्हणजे इंडियाना सुक्रोटेकचाच असे समीकरण ठरून गेलेले आहे.
या उपलब्धीसाठी आम्हांला मराठा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज कडून मानाचा ठरलेला “उद्योजकता मान पुरस्कार” मिळाला आहे.तसेच उद्योगश्री पुरस्कार आणि भारत सरकारकडून “शर्कराश्री” पुरस्कार मिळालेला आहे.
यावरच आमची घोडदौड थांबली नाही तर पुढे आम्ही साखर कारखान्याचे बॉयलिंग हाऊसचे मोठमोठे कंत्राट घ्यायला सुरुवात केली.ही कामे भारतात आणि परदेशातही अनेक ठिकाणी सुरू आहेत.तेथेही आमच्या वेळेत काम करण्याच्या पद्धतीला आणि उत्कृष्टप्रतीच्या यंत्रांना प्रचंड मागणी आहे, आता एखादा व्यवसाय म्हटला की त्यात स्पर्धा आलीच.आम्हालाही बरेच प्रतिस्पर्धी आहेत, काहींनी आमच्या यंत्राची कॉपी पण केली, तेंव्हापासून काही कारखान्याकडून, “इंडियाना मेक”च यंत्र पाहिजे असे परचेस ऑर्डर मध्ये नमूद करण्यात येते.येथेच आमचा विजय आहे, असे आम्ही समजतो आणि आमचे प्रतिस्पर्ध्याशी संबंध देखील सौहादाचे आहेत कारण व्यवसायात प्रत्येकाला जिभेवर साखर पेरणी आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच वावरावे लागते. साखर कारखान्याबाबत आमचे अनुभव खूपच चांगले आहेत सहकारी कारखानदारी विषयी मनात कृतज्ञतेचेच भाव आहेत.

व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यावर मी माझ्या समाजकारणाकडे वळाले. स्त्री शक्तीला उजागर करण्यासाठी मी आमच्या जातेगाव या गावी महिलांनी, महिलांसाठी, महिलांकरवी चालणारी ” नंदिनी महिला सहकारी दूध उत्पादक संस्था” स्थापन केली, त्यालाही महिलांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, एवढेच नव्हे तर “आदर्श दूध संस्था” म्हणून केंद्राच्या महिला आणि बालकल्याण तर्फे आम्हांला सरकारी अनुदान देवून गौरवण्यात आले. त्या अंतर्गत महिलांना गायी, म्हशी घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिली. “आमची माती, आमची माणसे” या दूरदर्शन वाहिनीवर आमच्या कामकाजाचे चित्रीकरण करून प्रसारण करण्यात आले. महिलांना त्यांच्याविषयी अस्तीत्वात असलेल्या कायद्यांविषयी शिबिरे भरवण्यात आली. लाडो अभियान अंतर्गत मी अनेक अपत्यहीन महिलांना त्यांचे मतपरिवर्तन करून मुली दत्तक दिल्या. त्याचप्रमाणे स्त्री भ्रूण हत्या विरोधात महाराष्ट्रभर अभियान राबविले. विशेषतः यवतमाळ, नागपूर येथे; जेथे स्त्रीभ्रूणहत्या जास्त होत त्या विदर्भातील दौरे देखील केले. मास्टर ऑफ सोशल वर्क करीत असताना पुणे शहरातील झोपडपट्टीत वाचनालये, बालवाड्या सुरू केल्या, रक्तदान शिबिरे, नेत्र तपासणी शिबिरे, आरोग्यविषयक जनजागृती शिबिरे भरविली.

पाहिले शब्द विश्व सहित्य संमेलन बँकॉक येथे “अनुभूती” या काव्यसंग्रहाचे सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम यांच्या हस्ते प्रकाशन होताना

पुण्यात “कथाभारती” आणि “बाल विकास प्रबोधिनी” या संस्थांच्या माध्यमातून लहान मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संगीत, नाट्य, नृत्य महोत्सव घेतले.त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी साहित्य संमेलने, कवी संमेलने आयोजित केले, त्यांच्या कवितांचे “उमलत्या कळ्या” हे काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, गंगाधर महाम्बरे, श्याम भुर्के, गावडे सर यांच्या हस्ते प्रकाशित केले.त्यालाही अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला.
“पर्वणी फिल्म्स” या बॅनरखाली लहान मुलांसाठी काही प्रबोधनात्मक मालिका बनवल्या.
साहित्य क्षेत्रात मुशाफिरी करीत असताना कविता, कथा, नाट्य, ललीत, स्फुट, चरित्रात्मक, मुलाखती असे चौफेर लिखाण केले.समीक्षण, परीक्षण केले.काही पुस्तकांना प्रस्तावना दिल्या.वर्तमानपत्रे, मासिकं, दिवाळी अंकात विस्तृत लिखाण केले, आकाशवाणीवर काम केले.साहित्य संमेलनात कविता सादर केल्या.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी “शब्द विश्व साहित्य”संमेलनात सहभागी होवून थायलंड, दुबई, बाली, श्रीलंकेचे दौरे केले.तेथे माझे तीन काव्यसंग्रह प्रकाशीत झाले.

गेल्या दहा वर्षांपासून पुण्यातील प्रसिद्ध “साहित्य चपराक” या साप्ताहिक, मासिक आणि दिवाळी अंकाची उपसंपादीका म्हणून मी कार्यरत असून चपराक प्रकाशनातर्फे माझे पाच हिंदी, मराठी काव्यसंग्रह, कथासंग्रह, चरित्रात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि लवकरच माझे पाच दीर्घ कथासंग्रह आणि पाच गूढ कथासंग्रह प्रकाशित होत आहेत.

समाजभानाच्या जाणिवेतून महाबळेश्वर जवळील दुर्गम भागात आम्ही सहा गावांच्या लोकांची आरोग्य तपासणी केली.वीस डॉक्टरांचा ताफा औषधासह घेवून आम्ही तेथे गेलो होतो, त्यावेळी नेत्र तपासणी करून त्या रुग्णांना चष्मे वाटप केले.नागपूरहून वनाधिकाऱ्यांना बोलावून त्यांना बांबू विषयक माहिती देवून “बांबू अभियान” राबविले.आता तेथील शेतकऱ्यांना त्यांच्याच परिसरातील रानमेवा आणि फळांचा वापर करून काही उद्योग स्थापित करून देण्याचा मानस आहे, तेथे दूध संकलन केंद्र सुरू करून त्यांच्या दुधाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. साखर उद्योगाबरोबरच आम्ही आता बांधकाम क्षेत्रात देखील उतरलो आहोत. आमच्या गावी आम्ही कॉमर्शियाल कॉम्प्लेक्स उभे केले आहे, तेथे डायग्नोस्टिक सेंटर उभारून ग्रामीण भागात आरोग्यविषयक सुविधा निर्माण करण्याची मनीषा आहे. याच दसऱ्याला “सकाळ ऍग्रोवन मार्ट”ची फ्रांचाईज घेवून शेतकऱ्यांना “अंडर वन रुफ” शेतीविषयक सर्वकाही म्हणजे खते, बी-बियाणे, पशुखाद्य, अवजारे रास्त भावात उपलब्ध करून देत आहोत.त्याच परिसरात नवीन सक्षम, संस्कारी भावी पिढी निर्माण करण्यासाठी त्या परिसरातील लहान मुलांसाठी जुडो, कराटे, संस्कार शिबिरे वगैरे सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत. असे बरेच प्रकल्प राबविण्याची इच्छा बाळगून आहोत. अर्थात हे सर्व करताना माझे पती प्रमोद बेलसरे आणि कन्या राजकुवर यांचाही तितकाच समर्थ साथ, सहयोग तितकाच महत्वाचा आहे.

इंडियाना सुक्रो-टेक पुणे प्रा.ली.तर्फे invented continuous vacuum pan चे मॉडेल सहित managing director श्री प्रमोद बेलसरे, डायरेक्टर सौ चंद्रलेखा बेलसरे आणि technical डायरेक्टर राजकुवर बेलसरे

माझी कन्या राजकुवर अभियांत्रिकीची पदवीधर असून तिचाही हा योगदानात सिंहाचा वाटा आहे. आपला साखर उद्योग सांभाळून ही सर्व विधायक कामे करताना आम्हा पती-पत्नीची जरूर दमशाख होते पण यातून आनंद आणि सार्थकतेचे समाधान ही मिळते.

एका संपन्न घराण्यात जन्माला येऊनही आमच्यात लहानपणापासूनच जाती, वर्ण, धर्म विद्वेषाच्या भावना कधीच रुजल्या नाहीत.मी माणूस ही जात आणि मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे मानते. वाईट प्रथा, रूढी, कर्मकांडे मला अजिबात पसंत नाहीत.जगात सर्वच माणसे चांगली असतात.त्यांना वाईट बनवते ती परिस्थिती!पण दृष्टिकोन निकोप असला तर सर्व जगच सुंदर भासते.फक्त कर्म करीत रहा, फळाची अपेक्षा करू नका, असे माझे तत्वज्ञान आहे.कोणाचे जाताजाता चांगले करता आले तर अवश्य करा पण जाणीवपूर्वक कोणाचे वाईट मात्र करू नका, असे माझे संस्कारी मन मला सांगते.या पृथ्वीवर निसर्ग, पशु, पक्षी, मानव सर्वच आपली भूमिका निभावताना दिसतात.ती भूमिका प्रामाणिकपणे पार पाडा, कोणाचे अहित करू नका, जमलेच तर चांगले करा, उद्यमशील राहून कर्तव्यपूर्ती करीत रहा कारण या धरतीवर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच आपले येण्याचे प्रयोजन अपेक्षित नाही तर “समाजाचे देणे फेडणे”ह्या कर्तव्यपूर्तीचा अंतर्भाव देखील अपेक्षित आहे.
जीवनाच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना एक मानसिक समाधान मिळते, केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते.जीवनात खुप मोठी माणसे जवळून बघायला मिळाली.त्यांचे कर्तृत्व, दातृत्व पाहायला मिळाले.त्यांच्या एवढे मोठे जरी होता आले नाही तरी निदान एक टक्का तरी या समाजासाठी काही करू, हा निर्धार मात्र कायम आहे.

c.p.belsare@gmail.com
9850895051 / 9325387203


Business Icon

1 comment

  • खूप सुंदर धाडसी व प्रेरणा देणारी माहिती मिळाली. अभिनंदन फलटण ला नक्की बोलावेन . जरुर यावे. आनंद वाटेल. /—/- रविंद्र बेडकिहाळ महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा जिल्हा प्रतिनिधी, अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळ महाराष्ट्र शासन, संपादक लोकजागर फलटण