सौ. प्रांजली अंबिके
सर्टिफाईड टॅली पार्टनर
(सोहम एंटरप्रायझेस)
ही कहाणी आहे एका ग्रामीण भागातून आलेल्या जिद्दी आणि मेहनती महिलेची. जिला शिक्षणाची खुप आवड आणि इच्छा होती. शिक्षणासाठी तिने आपल्या भावाला हट्ट केला व पुण्यात आली आणि पुणेकरच झाली. सुरवातीपासूनच स्वतःच्या व्यवसायाचे तिचे स्वप्न होते. काही काळ नोकरी केल्यानंतर तिचे व्यवसायाचे स्वप्न साकार झाले. घर, संसार, व्यवसाय आणि सामाजिक कार्य या तिन्ही पातळ्यांवर स्वतःची कणखर छाप आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या प्रांजली अंबिके यांचा हा प्रवास खूप काही सांगून जातो.
तुमच्या व्यवसायाचं अकाउंटींग व्यवस्थित करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच तज्ज्ञाची गरज भासते. कारण अकाउंटींग म्हणजे फक्त जमा-खर्चाचा हिशोब नसतो तर त्या पलीकडे वेगवेगळ्या शीर्षकाखाली वेगवेगळ्या खर्चांची नोंद करणे, वेगवेगळ्या बॅलन्स शीटसाठी आकडेवारी पुरवणे अशा अनेक गोष्टी असतात. पहिल्यापासूनचे अकाउंटींग जितके चोख तितके ते आयटी रिटर्न किंवा अन्य कागदपत्रे तयार करण्यासाठी फायदेशीर ठरते. प्रांजली त्यांच्या (सोहम एंटरप्रायझेस) माध्यमातून अकाउंटींग आणि टॅली सॉफ्टवेअर शी संबंधित विविध सेवा स्वतंत्रपणे पुरवतात.
बारावी पासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. प्रांजली या वाणिज्य शाखेच्या पदवीधर. खरंतर त्यांनी अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेतला होता. पण त्यांच्या मोठ्या बंधूच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी बारावीला वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदव्युत्तर पदवीही पूर्ण केली. पदवी पूर्ण केल्यानंतर लगेचच त्या एका सहकारी बँकेत नोकरी करू लागल्या. ज्युनियरअकाउंटंट म्हणून सुरवात केलेल्या प्रांजली यांनी ही नोकरी सीनियर अकाउंटंट या पदापर्यंत पोहोचल्यावर सोडली. त्यानंतर दोन वर्षे सेल्स आणि मार्केटींगमधला तर 4 वर्षे मॅन्युफॅक्चरींगमधला अनुभवही त्यांनी घेतला.
2011 मध्ये त्यांनी मोठ्या भावाच्या पाठिंब्याने अकाऊंट आउटसोर्सिंग आणि व्हॅट रिटर्नचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या दोनच वर्षांत त्यांची ग्राहकसंख्या भरपूर वाढली. विशेष म्हणजे जिथे त्यांनी नोकरी केली त्यांनीच त्यांच्या एका कंपनीचे काम दिले. व या व्यवसायातले त्यांचे पहिले ग्राहक बनले. 2013 मध्ये त्यांनी सीए ला अॅडमिशन घेतले. तीन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 2016 मध्ये व्यवसायाची नव्याने सुरुवात केली. हा निर्णय ही त्यांनी स्वत:च घेतला.
दरम्यानच्या काळात त्यांचा संघर्षही मोठा होता. 2008 मध्ये धनंजय अंबिके यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या चार-पाच महिन्यांतच त्यांना त्यांच्या सासु सासरया ना घेऊन घराबाहेर पडाव लागलं त्यांची जबाबदारी घेऊन प्रांजली आणि धनंजय हे दोघे घराबाहेर पडले. त्यावेळी भाड्याने खोली घेण्यासाठी डिपॉझिट देण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. अरेंज मॅरेज..झालेले असल्यामुळे त्या क्षणाला प्रांजली खूप भांबावून गेल्या होत्या. काय करावे काही सुचत नव्हते. परंतु वडिल आणि मोठ्या भावाने त्या प्रसंगात चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे एक व्यापक दृष्टी निर्माण झाली. त्यावेळी कोणालाही दोषी न ठरवता आपल्या मार्गाने चालत राहण्याचा जो सल्ला मिळाला, त्याचे पालन केल्याचे फळ आता मिळते आहे, असे प्रांजली सांगतात. पण तरीही स्वतःच्या जोरावर त्यांनी पतीसोबत मिळून जे काही घडवलं ते खूप मोठं आहे.
प्रांजली यांचा व्यवसाय सुरू झाला तो त्यांना मुलगा झाल्यानंतर तोवर त्या नोकरी करत होत्या. 2009 मध्ये त्या गर्भवती राहिल्या. नऊ महिने त्या कामावर जात होत्या. एक दिवस कामावरून आल्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्या बाळंत झाल्या. त्यांचा मुलगा सोहम आता बारा वर्षांचा आहे आणि सहावीत शिकत आहे. तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आणि तांत्रिक गोष्टीत तरबेज आहे. पण बाळंतपणानंतरही आर्थिक अडचणीमुळे काही दिवसातच म्हणजे अडीच महिन्यातच त्यांना नोकरी रुजु करावी लागली. काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांना व्यवसाय करावा असे वाटु लागले. मोठ्या बंधूंच्या पाठिंब्याने त्यांनी व्यवसाय सुरू केला. खरंतर आपल्या पतीने व्यवसाय करावा आणि आपण त्यांना त्यात साथ द्यावी अशी प्रांजली यांची इच्छा होती. पती धनंजय व्यवसायाची जोखीम घेण्यात थोडे मागे पडले. पण व्यवसायासाठी त्यांनी प्रांजली यांना कायम पाठिंबा दिला. त्यांच्या सासुबाई नी त्यांच्या मुलाची व घराची खुप चांगली काळजी घेतली म्हणून त्या एवढ सगळ करु शकल्या असे त्या म्हणतात.
2011 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. त्यांनी जीएसटी रिटर्न्स, साप्ताहिक-मासिक अकाउंटींग अशा आणखी सेवा व्यवसायात समाविष्ट केल्या. सुरुवातीला त्या स्वतः त्यांच्या सेवांचे वेगवेगळ्या कंपन्यामध्ये जाऊन मार्केटिंग करत होत्या. त्यांना जुन्या ग्राहकांकडून नव्या ग्राहकांविषयी संदर्भ मिळत होते. त्यामुळे नवे ग्राहक पटकन सेवा स्वीकारण्यासाठी होकार देत. त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये टॅली या सॉफ्टवेअर कंपनीची पार्टनरशिप घेतली. अकाउंटींगसाठी सर्वांत लोकप्रिय असलेल्या टॅली सॉफ्टवेअरच्या पार्टनरशिपमुळे त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
टॅलीच्या पार्टनरशिप मुळे त्यांना टॅली इन्स्टॉलेशन, रिन्यूअल, टॅली ट्रेनिंग, वार्षिक देखभालीचे कॉन्ट्रॅक्ट अशा सेवा सुरू केल्या. तसेच त्या जीएसटी सुविधा केंद्र, एनएसडीएल सेंटर, डीएससी डिस्ट्रिब्युटर इत्यादी त्या चालवत आहेत. आज घडीला प्रांजली यांचे 350 पेक्षा जास्त ग्राहक आहेत. त्या निरंतर न थांबता काम करत गेल्या. त्या म्हणतात त्यांना अखंड काम करत असताना खुप चांगलीच लोक मिळत गेली. माझी जोडलेली हिच माणसं माझी खरी कमाई आहे असं त्या म्हणतात.
अनेकदा टॅली किंवा अकाउंट्सशी संबंधित शंका बद्दल फोन येतात. परंतु प्रत्येक गोष्टीकडे व्यावसायिकतेने किंवा पैसे कमावण्याच्या दृष्टीने न पाहता प्रांजली मोकळेपणाने त्यांना मार्गदर्शन करतात. त्या क्षणाला फोन करणाऱ्याची समस्या सुटली तर त्याच्या चेहऱ्यावर काय आनंद येत असेल नाही? त्याच आनंदासाठी आपले अस्तित्त्व आणि आपला व्यवसाय आहे, अशा प्रांजली मानतात. प्रांजली यांचे ग्राहकच इतरांना प्रांजली यांच्या सेवेविषयी माहिती देतात, ही माउथ पब्लिसिटी प्रांजली यांच्या व्यवसायाच्या यशस्वीतेचे द्योतक आहे.
नोकरीत 8 तास काम करावे लागत होते. परंतु स्वतःचा बिझनेस सुरू केल्यावर बारा तासही कमी पडत होते. पण तरीही घरच्यांच्या सहकार्यामुळ प्रांजली यांना हे शक्य होत होते. दरम्यानच्या काळात बीएनआय, उद्योजक मिलन, बॉण्ड, हिंदु इकॉनॉमिक फोरम, इमपाॅवर नेटवर्क, रोटरी क्लब, अविरत श्रमदान, भटकंती कट्टा, अशा विविध नेटवर्किंग व सामाजिक ग्रुपचे सदस्यत्व प्रांजली यांनी घेतले. तसेच त्या महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या कमिटी मेंबर ही झाल्या.
या सगळ्या यशात मेहनत, जिद्द, चिकाटी त्याच बरोबर Happy Thoughts असतील तर अशक्य असे काही नाही असे त्या मानतात. त्या Happy Thoughts चे founder तेजगुरु सरश्री यांना आपले आध्यात्मिक गुरु मानतात. खुप योग्य वेळी ते त्यांच्या जीवनात आले. तेव्हापासून त्यांच्यात खुप सकारात्मक बदल झाले. खुप आत्मविश्वास त्यांच्यात आला असे त्या सांगतात.
Congratulation Madam
Very nice work
Best story